ऑक्टोबर महिन्यात होणार; पुणे आरोग्य महोत्सव : पुणेकरांचा उत्साह, कलाकारांचा सहभाग
सार्वभौम न्युज समूह
पुणे, दि. ०९ सप्टेंबर २०२५
पुणे (प्रतिनिधी) : पुण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवाला आरोग्याची जोड देणारा ‘पुणे आरोग्य महोत्सव’ येत्या पुढील ऑक्टोबर २०२५ महिन्यात थाटात साजरा होणार आहे. पुण्यातील कलाकार, अभिनेते, लोक कलावंत, साहित्यिक, तंत्रज्ञ आणि सर्वसामान्य नागरिकांच्या उत्साहपूर्ण सहभागाने हा महोत्सव अविस्मरणीय ठरणार आहे, अशी माहिती रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष श्री. उमेश चव्हाण यांनी दिली.


या महोत्सवाच्या नियोजनासाठी आज निवृत्त पोलीस महानिरीक्षक श्री. चंद्रशेखर दैठणकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक पार पडली. यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. मेघराजराजे भोसले, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मुख्य कार्यवाह सौ. सुनिताराजे पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. भानुप्रताप बर्गे, श्री. मिलिंद गायकवाड, सौ. संगीता पाटील, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री. भारत देसडला, गायक श्री. अमर पुणेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. राजाभाऊ कदम, रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहराध्यक्ष सौ. अपर्णा मारणे साठ्ये, परिषदेचे उपाध्यक्ष श्री. आशिष गांधी, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई, सौ. रेखा वाघमारे, सौ. प्रभा अवलेलू, चित्रपट महामंडळाचे सदस्य श्री. अनिल गुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते श्री. इक्बाल शेख आणि श्री. शांताराम खलसे उपस्थित होते.
हा एकदिवसीय महोत्सव आरोग्य आणि संस्कृती यांचा सुंदर मिलाफ असेल. यात आरोग्य दिंडी, चर्चासत्र, परिसंवाद, व्याख्याने, नाट्यप्रयोग, कवी संमेलन, संगीत मैफल, अभिवाचन, पुस्तक प्रकाशन आणि पुस्तक प्रदर्शन असे आरोग्य विषयक विविध विशेष कार्यक्रम होणार आहेत. पुण्यातील नामांकित डॉक्टर या सोहळ्यात सहभागी होणार असून, शासकीय आरोग्य योजनांद्वारे सहभागी कलाकार आणि नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी आणि शस्त्रक्रिया उपलब्ध होणार आहेत. यामध्ये मेंदू, हृदयरोग, कॅन्सर, सांधे प्रत्यारोपण, मूत्रपिंड आणि यकृत शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी, मोफत चष्मा वाटप, त्वचा विकार यासह विविध तपासण्या केल्या जाणार आहेत.
या महोत्सवात सुप्रसिद्ध लेखक, साहित्यिक आणि कला क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार असून, त्यांच्या सहभागाने हा सोहळा अधिक रंगतदार होणार आहे. “पुण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जाणिवांना एका व्यासपीठावर आणणारा हा महोत्सव खास ठरेल,” असे श्री. उमेश चव्हाण यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी श्री. उमेश चव्हाण यांच्याशी ९८२२०८१५४० या क्रमांकावर संपर्क साधावा.






