मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी
सावभौम न्युज समूह
दिल्ली (प्रतिनिधी) : काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी आज दिल्लीतील इंदिरा भवन सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोपांचा भडिमार केला. मतदार यादीतून दलित, मागासवर्गीय आणि आदिवासी मतदारांची नावे मुद्दामहून वगळली जात असल्याचा दावा त्यांनी केला.
“माझ्याकडे 100 टक्के पुरावे आहेत,” असा दावा करत त्यांनी निवडणूक आयोग मुख्य आयुक्त चोरांना पाठीशी घालत असल्याचा घणाघाती आरोप केला.
मत चोरीचा ‘हायड्रोजन बॉम्ब’
राहूल गांधी यांनी गेल्या काही महिन्यांपासून मत चोरीचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला आहे. बिहारमधील मतदार जागृती यात्रेच्या समारंभात त्यांनी ‘हायड्रोजन बॉम्ब’ फोडण्याची घोषणा केली होती. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा बॉम्ब नसला तरी पुराव्यांचा भक्कम आधार सादर केला. “हा हायड्रोजन बॉम्ब नाही, पण आम्ही सत्य समोर आणत आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कर्नाटकातील आळंद मतदारसंघात 2023 मधील निवडणुकीत 6,018 मतदारांची नावे डिलीट करण्यात आली. विशेषतः यात दलित आणि ओबीसी मतदारांचा समावेश आहे. राहूल यांनी सांगितले की, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आणि बाहेरील फोन नंबर वापरून मतदार यादीतून नावे हटवण्यात आली. “सूर्यकांत नावाच्या व्यक्तीने 14 मिनिटांत 12 मतदार डिलीट करण्याचे अर्ज भरले,” असे त्यांनी पुराव्यासह सादर केले.
निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
“निवडणूक आयोग व्यवस्थितपणे लाखो मतदारांना लक्ष्य करून त्यांची नावे हटवत आहे,” असा गंभीर आरोप राहूल यांनी केला. महाराष्ट्रातील राजूरा मतदारसंघातही हजारो मतदारांची नावे डिलीट झाल्याचा दावा त्यांनी केला. “आम्ही पुराव्यांसह बोलत आहोत. दलित आणि ओबीसी समाज हा त्यांचा लक्ष्य आहे. मी माझ्या देशाच्या आणि संविधानाच्या रक्षणासाठी लढेन,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
राहूल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर संगनमताचा आरोप केला. “विपक्षाला मत देणाऱ्या समाजाच्या मतांचा छेद दिला जात आहे,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी व्हिडिओ आणि इतर पुरावे सादर करत आपले म्हणणे मांडले.
पत्रकार परिषदेपूर्वीचा व्हिडिओ
पत्रकार परिषदेपूर्वी काँग्रेसच्या अधिकृत पेजवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. यात सिद्धू मूसेवाल्याच्या गाण्यासह “कुर्सी की पेटी बांध लीजिए” असा संदेश होता. यामुळे राहूल गांधी पुन्हा एकदा मत चोरीचा मुद्दा उपस्थित करतील, अशी चर्चा रंगली होती. यापूर्वी 7 ऑगस्ट रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कर्नाटकातील एका लोकसभा मतदारसंघाच्या आकडेवारीचे विश्लेषण सादर करत मत चोरीचा आरोप केला होता.
निवडणूक आयोग आणि भाजपवर टीकास्त्र
राहूल गांधी यांनी निवडणूक आयोगावर संविधानाविरुद्ध गुन्हा केल्याचा आरोप केला. “निवडणूक आयोग भाजपसोबत मिळून मत चोरी करत आहे,” असा थेट हल्ला त्यांनी चढवला. बिहारमधील 1 सप्टेंबर रोजीच्या कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला होता. “हायड्रोजन बॉम्ब फोडल्यानंतर पंतप्रधान देशाचा सामना करू शकणार नाहीत,” असे त्यांनी म्हटले होते.