ट्रिनिटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये वाचन संस्कृतीचा जागर
कोंढवा येथील कल्याणराव जाधव शैक्षणिक संकुलातील ट्रिनिटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून ओळख लाभलेले महान वैज्ञानिक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिनाचे’ आयोजन करण्यात आले होते.
प्राचार्य डॉ. शंकर लावरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये ‘वाचन संस्कृतीचा’ जागर करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. धनाजी व्यवहारे यांनी केले तर कार्यक्रमाच्या प्रसंगी उपप्राचार्य भाऊसाहेब घोडके यांनी उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर सहकारी यांना ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जीवनपट थोडक्यात उलगडून दाखवला. ‘अग्निपंखाची भरारी’ या ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनचरित्रातील काही प्रेरणादायी प्रसंगांची आठवण करून देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे ‘अग्निपंखांची भरारी’ हे पुस्तक सर्वांनी वाचून काढण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शंकर लावरे हे उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना “विद्यार्थ्यांच्या जीवनात वाचनाचे महत्त्व कसे आहे” यावर त्यांनी आपले विचार मांडले. वाचनामुळे ताण तणाव दूर होतो, सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढीस लागून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो त्यामुळे आजच्या ‘वाचन प्रेरणा दिनाच्या’ निमित्ताने सर्वांनी वाचनाची आवड जोपासावी असा सल्ला त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. या उपक्रमामध्ये शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सहकारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. विघ्नेश कडू यांनी मानले.






