पुण्यात निवडणुकीआधीच राष्ट्रवादीत कलह; ‘त्यांचं वक्तव्य बालीशपणाचं’, प्रशांत जगतापांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांना पुण्यात खीळ बसली आहे. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवारांची भेट घेऊन पुण्यात अजित पवार गटासोबत युतीला स्पष्ट विरोध दर्शवला. त्यांच्या या भूमिकेला शरद पवारांनी पाठिंबा दिल्याचा दावा जगताप यांनी केला आहे.
दुसरीकडे अजित पवार गट मात्र निवडणुकीपूर्वी शरद पवार गटासोबत आघाडी करण्यास उत्सुक आहे. पण प्रशांत जगताप ठाम असल्याने अजित गटाकडून त्यांच्यावर टीका करण्यास सुरूवात झाली आहे. शरद पवार गटाचे पुणे महापालिका शिक्षण मंडळ सदस्य विनायक चाचर यांनी पत्रक काढून जगतापांवर जोरदार टीका केली. “जगतापांचा निर्णय वैयक्तिक आणि बालीश आहे, पक्षापेक्षा कोणी मोठा नाही,” असे विनायक चाचर म्हणाले आहेत.
‘राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पुणे शहर पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्यास विरोध केला. मुळात हे त्यांचे वैव्यक्तिक मत आहे. ही काही कार्यकारीणी किंवा पक्षाचे पदाधिकारी यांना मिटींग घेवून विचारणा किंवा ठराव केलेला नाही. त्यांचे विधान म्हणजे पक्षाला खिंडीत पकडण्याचे आहे. पण पक्षा पेक्षा कोणी मोठा नसतो. आपले स्वतःचे अस्तित्व नष्ट होणार ह्या भितीने केलेले हे बालीशपणाचे विधान आहे. एकतर त्यांनी स्वतःचा राजीनामा देवून पक्षातून बाहेर पडावे अथवा हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारावा.


प्रशांत जगताप यांचं प्रत्युत्तर
“हा पक्ष आणि माविआला जन्म शरद पवार यांनी दिली आहे. त्यामुळे साहेबांशी बोललो आहे, आमची एक बैठक झाली. त्यात आपण महाविकास आघाडीसोबत जावी अशी आहे, त्यामुळे चर्चा झाली आहे. प्रक्रिया बाहेरील कार्यकर्ते यांनी बोलले असेल तर यात जास्त काही बोलावे असे वाटत नाही, आमच्यात कोणी नाराज नाही, आमची बैठक झाली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढण्यावर आमची चर्चा कधीही झाली नाही, नव्हती”, असं म्हणत प्रशांत जगताप यांनी चाचर यांच्या टीकेला उत्तर दिले आहे






