कुणी सांगितलं होतं महायुतीत यायला? भरत गोगावले यांनी अजितदादा गटाला डिवचले
नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीत महायुतीतील लाथाळ्या चर्चेचा विषय ठरला आहे. भाजप विरुद्ध शिंदे सेना, शिंदे सेना विरुद्ध अजितदादा राष्ट्रवादी तर भाजपविरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला आहे.
महायुतीतच जास्त लढाई सुरू आहे. तीन पक्षातच जास्त संघर्ष दिसून येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार निलेश राणे, मंत्री माणिकराव कोकाटे आणि आता भरतशेठ गोगावले अशी ही यादी वाढतच चालली आहे.
आज उपमुख्यमंत्री शिंदेंचा रोड शो


रोहा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रोह्यातील भव्य रोड शो मध्ये सहभागी होणार आहेत. खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रोह्यात यंदा शिंदे शिवसेनेकडून रोहा नगरपालिके करता २० अधिक १ उमेदवार रिंगणात उतरल्याने या रोड शोला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. धावीर महाराज मंदिरापासून सुरू होणारा हा रोड शो शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा धोत्रे यांच्या निवासस्थानापर्यंत जाणार आहे.
कोकणात उफाळला शिंदेसेना-राष्ट्रवादी वाद
पालकमंत्री पदावरून अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेना यांच्यात वाद आहे. रायगडमध्ये तटकरे विरुद्ध गोगावले असा सामना गेल्या विधानसभा निवडणूक निकालापासून दिसून येत आहे. त्यात पालकमंत्री पदावरून तर हे संबंध जास्त विकोपाला गेले आहेत. अनेक कार्यक्रमात, सभांमधून मनातील खदखद दोन्ही बाजूने वेळोवेळी व्यक्त होतेच. आताही कोकणातील हा शिमगा पुन्हा समोर आला आहे. भरतशेठ गोगावले यांनी पुन्हा एकदा अजितदादांच्या राष्ट्रवादीवर निशाणा धरला आहे.
आम्ही सुरत मार्गे गुवाहाटीला चांगल्या कामासाठी गेलो, चुकीच्या कामासाठी नाही. आम्ही ते सर्व केलं म्हणूनच हे ‘रामायण-महाभारत’ घडलं, हे सर्वांना ठाऊक आहे. देशातला सर्वात मोठा उठाव होता. काहींना तो पचनी पडला नसला तरी काही लोक टीका करतात, करू देत, असे गोगावले म्हणाले.
तटकरेंवर घेतले तोंडसूख
यावेळी भरत गोगावले यांनी तटकरे यांच्यावर पुन्हा टीका केली. जे टीका करतात, तेही सव्वा वर्षाने आमच्यात सामील झाले. पचत नसेल, पटत नसेल तर कोणी सांगितलं होतं आमच्यात यायला? असा रोकडा सवाल त्यांनी केला. त्यांनी दिलेलं आव्हान आम्ही स्वीकारलं आहे. आम्ही मैदानातून पळ काढणारे नाही; आम्ही लढणारे लोक आहोत, रडणारे नाही, असे गोगावले म्हणाले.






