जयकर अनुयायी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये उत्साहात संपन्न
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयातून अभ्यास करून अधिकारी झालेल्या अनेक जयकर अनुयायी मित्रांचा स्नेह मेळावा नुकताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या सर सी. व्ही. रमण सभागृहामध्ये संपन्न झाला. या स्नेहमेळाव्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर शासनाच्या विविध खात्यामध्ये आणि खाजगी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या सव्वाशेहून अधिक जयकर अनुयायांनी आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आय.आर. एस. बाळासाहेब नागवे हे उपस्थित होते तर कार्यक्रमासाठी ए.सी.पी. विक्रम कदम, सीनियर पॉलिस इन्स्पेक्टर विजय चव्हाण, प्रा.डॉ. विजय कोठावदे, मंत्रालय स्विय सहाय्यक सचिन खोमणे, अधीक्षक उद्योग संचालनालय मुंबई नितीन कोळेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनाचे संचालय डॉ.गणेश भामे आणि प्रा.बाबासाहेब दूधभाते आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योजक कृष्णा कुडूक यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.भास्कर घोडके यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जयकर ग्रंथालयामध्ये एकेकाळी अभ्यास करतानाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. अनेकांचे अनुभव अंगावर शहारे आणणारे होते. खिशात पैसे नसताना कमवा आणि शिका सारख्या विद्यापीठाच्या योजनेचा आधार आणि वसतिगृहामध्ये प्यारासाईटचे जीवन व्यतीत करत केलेला अभ्यास, मित्रांच्या ताटात एक्स्ट्रा दोन पोळ्या घेऊन केलेले जेवण, आठ बाय दहाच्या सिंगल होस्टसाठीच्या रूममध्ये 8-10 जणांचे रूममध्ये मिळेल त्या ठिकाणी कानाकोपऱ्यात ठेवलेले सामान, रविवारच्या संध्याकाळच्या मेसच्या सुट्टीमध्ये पाण्यात बुडवून बिस्किटे खाऊन काढलेल्या रविवारच्या संध्याकाळी, विद्यापीठातील सेवक विहारातील लग्नांना जेवणाच्या निमित्ताने लावलेली हजेरी, मित्रांच्या घोळक्यात घुसून फुकट मिळवलेला चहा, जयकर मधील मित्रांच्या टेबलवर जाऊन वाचून काढलेली वर्तमानपत्रे आणि पुस्तके, दिवाळी सणाला गावी घरी न जाता अभ्यासिकेतच राहून केलेला अभ्यास, पोस्ट निघत नसल्यामुळे गावाला जाण्याचे टाळणारे आणि गेलेच तर रात्री उशिरा पोहोचून दुसऱ्या दिवशी गाव जाग्या होण्यापूर्वीच पुन्हा जयकराची वाट धरणारे अनेक संघर्षयोद्धे त्यांच्या कटू अनुभवांची मांडणी विनोदाची झालर लावून करत होते आणि एकमेकांना खळखळून हसवत होते.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अनेक जयकर अनुयायांनी उपस्थिती लावली. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मिळवलेल्या यशाने हुरळून न जाता आपल्यासारख्याच विद्यापीठातील शेकडो गरीब विद्यार्थ्यांना आपण मदतीचा हात पुढे केला पाहिजे अशी भावना बऱ्याच जणांनी व्यक्त केली. कार्यक्रमाची सांगता विद्यापीठ हेरिटेज वॉकने करण्यात आली. मेन बिल्डिंग मधील भुयारी मार्ग ते एलीस गार्डन तसेच मुख्य इमारतीमधील श्री संत ज्ञानेश्वर हॉल(पूर्वीचा बॉल डान्स हॉल), सरस्वती हॉल, सिनेट मीटिंग असेम्ब्ली हॉल आदींची माहिती इतिहास विभागामध्ये पी.एच.डी.चे संशोधन करणाऱ्या तुकाराम शिंदे या विद्यार्थ्याने दिली. कार्यक्रमाचे आभार ग्रामविकास अधिकारी वसंत पवार यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उद्योजक कृष्णा कुडूक, प्रा. भास्कर घोडके, विद्यापीठ कर्मचारी बसवंत गझलवार, ग्रामविकास अधिकारी वसंत पवार, समाजकल्याण विभागातील अधिकारी दिनेश साबळे आदींनी विशेष परिश्रम घेतले. या संपूर्ण कार्यक्रमाच्या आठवणींना चित्रबद्ध करण्यासाठी आशिष कचरे यांचे सहकार्य लाभले.






