पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या प्रवेशामुळे वडगाव शेरीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, दुसरीकडे प्रभाग क्रमांक चारमधून भाजपकडून इच्छुक उमेदवार तसेच नारायण राणे यांचे समर्थक सचिन सातपुते यांनी नारायण राणे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
एकीकडे आमदार पुत्रांचा भाजपमध्ये प्रवेश, तर दुसरीकडे नारायण राणे समर्थकांची मुख्यमंत्र्यांशी थेट भेट—या घडामोडींमुळे वडगाव शेरी मतदारसंघातील प्रभाग क्रमांक चारमधून भाजपची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात या हालचालींमुळे स्थानिक राजकारणात आणखी चुरस निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.