इराण-अमेरिका संघर्ष पेटणार? डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान चर्चेत; म्हणाले, “आमचा एक मोठा सैन्य ताफा.”
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी पुन्हा एकदा इराणला गंभीर इशारा दिला आहे. इराणच्या दिशेने एक मोठा लष्करी ताफा चालून जात आहे असे ट्रम्प म्हणाले आहे. तसेच गेल्या अनेक दिवसापासून इराणमध्ये आंदोलने सुरू आहेत, त्यामुळे या भागात तणाव शिगेला पोहचलेला आहे, अशा पार्श्वभूमीवर लष्करी कारवाई टाळता येईल, अशी आशा अमेरिकेने व्यक्त केली आहे.
माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेने मोठी जहाजांचा ताफा या भागात तैनात केला आहे, मात्र त्याचा वापर करण्याची गरज पडू नये अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. “आमचा एक मोठा फ्लोटीला त्या दिशेने जात आहे, आणि पुढे काय होते ते आपण पाहूया. आमचा एक मोठा सैन्य ताफा (big force) इराणच्या दिशेने जात आहे. काही घडू नये असेच मला वाटते, पण आम्ही त्यांच्यावर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहोत,” असे ट्रम्प म्हणाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये आंदोलकांच्या हत्या होत असल्याच्या मुद्द्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीही अनेकदा इराणविरोधात लष्करी कारवाई करण्याची धमकी दिली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून निदर्शने कमी होत असल्याने ट्रम्प यांचे वक्तव्यांमध्ये काहीसा मवाळपणा आल्याचे दिसून येत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकेच्या दबावामुळे इराणच्या सरकारने शेकडो आंदोलकांची फाशी रद्द केल्याचा दावा केला आहे. ट्रम्प म्हणाले, “मी गुरुवारी ८३७ जणांची फाशी थांबवली. ते सर्वजण ठार झाले असते. त्यापैकी प्रत्येकाला फासावर लटकवले गेले असते.”
ट्रम्प म्हणाले की, ज्यांना फाशीची शिक्षा झाली होती त्यापैकी बहुतेक जण हे तरूण होते. याबरोबरच ट्रम्प यांनी दावा केला की इराणला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिल्यानेच इराणने माघार घेतली.
ट्रम्प म्हणाले, “मी म्हणालो, जर तुम्ही त्या लोकांना फासावर लटकवले, तर तुम्ही आजवर कधीही झाला नाही इतक्या तीव्रतेने तुम्हाला लक्ष्य केले जाईल. आम्ही तुमच्या अणुकार्यक्रमाचे जे काही केले आहे, ते त्यासमोर अगदी शुल्लक वाटेल.” डोनल्ड ट्रम्प यांच्या मते फाशीची प्रक्रिया पार पडण्याच्या काही काळापूर्वीच ती थांबवण्यात आली.
अमेरिकेची लष्करी तयारी
अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की एअरक्राफ्ट कॅरिअर स्ट्राईक ग्रूप आणि इतर लष्करी साधने येत्या काही दिवसात मध्य पूर्वेत येणे अपेक्षित आहे, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्याच्या अखेरीस इराणमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू झाली आणि त्यानंतर ती देशभर पसरली. त्यानंतर इराण सरकारकडून ही निदर्शने दडपण्यासाठी अत्यंत कठोर कारवाई केली जात असल्याचे सांगितले जात आहे. या आंदोलनादरम्यान हजारो लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.






