Home » शिक्षा » प्रजासत्ताकदिनी शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांचे आदेश

प्रजासत्ताकदिनी शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांचे आदेश

Facebook
Twitter
WhatsApp
15 Views

प्रजासत्ताकदिनी शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांचे आदेश

पुणे – राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय आणि खासगी व्यवस्थापनांच्या सर्व शाळांना प्रजासत्ताकदिनी (ता. २६) देशभक्तिपर गीतांवर सामूहिक कवायत संचलनाचा कार्यक्रम आयोजित करणे अनिवार्य आहे. यात विद्यार्थ्यांच्या १०० टक्के उपस्थितीचे उद्दिष्ट आहे. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन या दोन्ही दिवशी शाळांना सुट्टी देण्यात येऊ नये, असा आदेश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये येत्या सोमवारी (ता. २६) प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी देशभक्तिपर गीतांवर सामूहिक कवायत संचलनाचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. हा कार्यक्रम ‘राष्ट्र प्रथम’ संकल्पनेवर आधारित असून, राज्यातील एक लाखाहून अधिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधील तब्बल दोन कोटी १० लाखांहून अधिक विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. या उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत सिंह यांनी ही माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी, सचिव डॉ. दीपक माळी, शिक्षण विभागाचे सहसंचालक हारून अत्तार, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. महेश पालकर यावेळी उपस्थित होते. प्रजासत्ताकदिनी शासकीय झेंडावंदन कार्यक्रमानंतर देशभक्तिपर गीतांवरील सामूहिक कवायत होणार आहे. सुमारे वीस मिनिटे कालावधीचा हा कार्यक्रम असेल. ‘आनंददायी शनिवारी’ विद्यार्थ्यांच्या कवायतींचा सराव करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, आरोग्य जागृती, व्यायामासाठी प्रेरित करणे हा उपक्रमाचा उद्देश आहे. एनसीसी, स्काउटच्या विद्यार्थ्यांची कवायतीसाठी मदत घेता येते. कवायतीचा फायदा विद्यार्थ्यांच्या शिक्षणातही होतो. एकाच परिसरात असलेल्या प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी एकत्रितपणे संचलन कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या दिवशी विद्यार्थ्यांनी गैरहजर न राहता शंभर टक्के उपस्थिती राहील याची दक्षता शाळांनी घेतली पाहिजे, असेही सिंह यांनी या वेळी सांगितले. क्रीडा शिक्षकांची भरती करणार ‘राज्यात दुर्दैवाने शाळांमध्ये ‘पीटी’चा तास गांभीर्याने घेतला जात नाही. या तासाच्या वेळीदेखील अभ्यासाचाच तास घेतला जातो. परंतु, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाबरोबरच खेळ, व्यायामही महत्त्वाचा आहे. त्यामुळे शाळांना क्रीडा शिक्षक उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील चार हजार ८६० केंद्र शाळांमध्ये क्रीडा शिक्षक पदांची निर्मिती केली आहे. या पदांवर आता शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे,’ असे राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!