अडुसष्ठाव्या वर्षी केलेला आयुष्यातला पहिला ट्रेक.
डोंबिवलीचे ट्रेकर विजय वाठारे (आनंद यात्रा पर्यटन) यांनी तीन दिवसांची हरिश्चंद्रगड पदभ्रमंती आयोजित केली आहे असं समजलं. आतापर्यंत नुसतं ट्रेकविषयी ऐकलं होतं, पण कधीच कुठला ट्रेक असा केला नव्हता.
पण आमचे कुटुंब मित्र सागर ओक आणि त्यांचा मुलगा अभिजित जाणार असं समजलं. मन द्विधा होतं कारण माझं वय अडसष्ट आणि अनुभव काहीच नाही. हरिश्चंद्रगडाची ऑनलाइन माहिती वाचली तर जरा कठीणच वाटलं. माझ्या मुलानं तर साफ विरोध केला, कारण त्यानं हा ट्रेक केला होता. अर्थात त्याच्या नकारामागे माझ्याविषयीची काळजी आणि प्रेम होतं. पण मी मात्र हिंमत करून सहभागी होण्याचं ठरवलं.
सागर आणि त्यांचा मुलगा अभिजित हे ओळखीचे होतेच आणि त्यांच्या बरोबर एक डॉक्टर मित्र डॉ. कुमार ठकारही येणार असं समजलं. म्हणजे काही झालं तर बरोबर डॉक्टरही आहेत. आणि मी या ट्रेकला जायचं नक्की केलं. विजय वठारे हे या क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती आहेत आणि चाळीसवेळा हरिश्चंद्रगड चढले आहेत हे समजलं. माझ्याबरोबर अजून एक महिला असणार होत्या आणि त्या ट्रेकरच होत्या. त्यामुळे मनाचा विचार पक्का झाला.
या ट्रेकमध्ये आम्ही एकूण आठ ज्येष्ठ पुरुष आणि आम्ही दोघी असे मिळून दहा जण होतो. विजय यांनी हा ट्रेक खास ज्येष्ठांसाठी ठरवला होता. यात एकटा अभिजित तरुण होता. हाही मनाला दिलासा होता.
रविवारी १८ जानेवारीला १०.२०ची कासारा ट्रेन पकडली. अर्पिता देसाई डोंबिवलीला गाडीत चढल्या. त्यांना पाहताच जरा धीर आला. दुपारी, आम्ही सगळे कसारा रेल्वे स्थानकावर एकत्र जमलो. बहुतेक सर्व मंडळी मुंबई परिसरातली होती तर कुमार, अभिजित आणि सागर पुण्याहून आले होते. तिथे आमचे कॅप्टन विजय यांनी आमच्यासाठी दोन जीप तयार ठेवल्या होत्या. त्यात बसून आम्ही निघालो. भंडारदरा धरण वाटेत लागलं. तिथे फोटो काढून निघालो.
जाताना नासिक जिल्ह्यातील आवंदा-पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या टाकेद गावातील पक्षीतीर्थ किंवा सर्वतीर्थ पाहिलं. त्याची कथा अशी की, रावण सीतेला पळवून नेत असताना पक्षीराज जटायूने जेव्हा रावणाला अडवायचा प्रयत्न केला तेव्हा रावणाने त्याचा पंख छाटला ते हे ठिकाण. पुढे श्रीरामाची भेट झाली त्यांनी जमिनीत बाण मारून पाणी काढले व तडफडणाऱ्या जटायूला दिले. तेच टाकेदचे सर्वतीर्थ. तिथून निघालो आणि पुढे आम्ही भंडारदरा, राजूरमार्गे रतनगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रतनवाडीच्या अमृतेश्वर मंदिरात गेलो. खूप प्राचीन दगडी मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवाची पिंड वीतभर पाण्यात आहे. या मंदिराच्या आसपास थोडीशी घरं होती. अत्यंत सर्वसाधारण आर्थिक स्थिती असलेले लोक फुलं, पूजेचं समान विकत होती. मंदिराच्या बाहेर बसून मावळत्या दिनकराला नमन केलं. फोटो तर काढलेच, पण विजयनी डोंबिवलीहून आणलेल्या मस्त गुळपोळ्या आणि बरोबर भरपूर तूप याचा आस्वाद घेतला.
तिथून आम्ही परत भंडारदऱ्याला MTDC च्या रिसॉर्टमध्ये मुक्कामाला आलो. त्या आलिशान डिलक्स रूम पाहिल्या आणि प्रवासाचा शीण उतरला. रात्री जेवण झाल्यावर कॅम्पफायर झालं. ट्रेकचा मूड तयार झाला. थंडी आम्हा मुंबईकरांना चांगलीच जाणवत होती. पण शेकोटीची उब होती. सगळ्यांनी आपापलं गायन कौशल्य दाखवलं. मीही माझ्या बालवाडीत शिकवलेली बालगीतं म्हणून दाखवली. ते सगळ्यांना आवडली. विजय यांनी दुसऱ्या दिवशीच्या सूचना दिल्या.
सोमवारी पहाटे लवकर आटोपून आम्ही जीपने हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचनई गावातील सरपंच भास्कर बदड यांच्या घरी पोहचलो. तिथे आम्हाला गरमागरम उपम्याचा नाश्ता मिळाला. आमचा ट्रेक खऱ्या अर्थानं तिथून सुरू झाला. आमच्याकडचं जास्तीचं सामान गावातील चार भारवाहकांकडे देऊन सगळे सकाळी नऊ वाजता हरिश्चंद्रगड चढायला सुरुवात केली. माझ्या पाठीवर छोटीशी सॅक होती. संपूर्ण वाट चढणीची होती, पण वाटेत बऱ्यापैकी झाडीचा रस्ता होता. काही ठिकाणी कडेला लोखंडी कठडे लावले होते. एके ठिकाणी चाळीस पायऱ्यांचा एक लोखंडी जिनाही होता. दर तासांनी ”अजून किती चढण आहे?” या माझ्या प्रश्नाला न कंटाळता ”अजून फक्त अर्धा तास” हे सागर न कंटाळता सांगत होते. सगळ्यात शेवटी मी व माझे मार्गदर्शक सागर ओक पोहोचलो. कारण मला ट्रेकचा काहीच अनुभव नव्हता. आता या दगडावर डावा पाय मग उचलून उजवा पाय टाका, अशा सूचना माझे गाईड देत होते. सगळे इतके भरभर चढून जायचे, पण आमच्यासाठी थांबायचे. नंतर मला भीती वाटायला लागली की आले खरी वर चढून, पण उतरताना काय? सर्वजणांनी तीनेक तासांत गडाचा माथा गाठला. आम्हीच सर्वात शेवटी पोहोचलो तेव्हा पहिला की आधी वर पोहोचलेली मंडळी तिथल्या एका घराबाहेर जेवणासाठी थांबली होती. मस्त गरम गरम पिठलं भाकरी पाहून सगळा शीण निघून गेला.
दुपारचं जेवण झाल्यावर आम्ही तिथेच जवळपास असलेले श्री हरिश्चंद्रेश्वराचं पुरातन मंदिर व भल्या मोठ्या दगडी गुहेत कोरलेलं केदारेश्वराचं अद्वितीय मंदिर पाहिलं. या मंदिराचं वैशिष्ट्य असं की, ही मोठ्ठी पिंड कंबरभर पाण्यात आहे आणि ते पाणी बारा महिने थंडगार असतं. एक आख्यायिका या शिवलिंगाबद्दल ऐकली. शिवलिंगाच्या चार बाजूला चार दगडी खांब आहेत- ज्यापैकी तीन खांब- जे तीन पूर्ण झालेली युगे आहेत असं मानतात आणि एक शिल्लक असलेला खांब हा कलियुगाचं द्योतक आहे आणि तो खांब जेव्हा झिजून जाईल तो या युगाचा अंत असेल अशी लोकांत मान्यता आहे. त्या गुहेसमोर बसलो. खूप प्रसन्न वाटलं. गडावर भरपूर वर्दळ होती. तरुणाईच्या उत्साहाला उधाण आलं होत. कंबरभर पाण्यात उतरून शिवलिंगाला प्रदक्षिणा चालल्या होत्या. ”आमचा फोटो काढून देणार का?” म्हटल्यावर आनंदाने फोटो काढून देत होते.
आमची वयं पाहून त्यांच्या डोळ्यात अपार आश्चर्य आणि कौतुक जाणवत होतं. मंदिराच्या जवळपास अजून काही गुहा आहेत त्या बघून आम्ही पुढे तासभर चालून प्रसिद्ध कोकणकड्यावर गेलो. तिथेच एका घरात आमच्या रात्रीच्या जेवणाची सोय केलेली होती. पाचनाईच्या सरपंचांचं ते घर होतं. तिथेच जवळ मोकळ्या जागी आमच्यासाठी पाच तंबू लावले होते. तिथे आमचं सामान ठेवून आम्ही सगळे शेजारीच असलेल्या कोकणकडा नामक भारतातील बहुदा सर्वात मोठ्या एककातळी उभ्या-आडव्या, बशीच्या आकाराच्या कड्याच्या वरच्या काठावर सूर्यास्त पाहायला जाऊन थांबलो. थंडीमुळे धुकं होतं.फार लांबचे डोंगर स्पष्ट दिसत नव्हते. निसर्गाचं ते रूप पाहून मला तर खूपच भारी वाटलं. आमच्या बरोबर असलेले प्रकाश पेठे अगदी उत्साहानं सर्वांना असं उभं राहा, तसं बसा असं सांगून फोटो काढत होते. डॉ. ठकार यांना बघून पंचाहत्तरी लागायला काही दिवस कमी आहेत हे बघून वाटत नव्हतं. इतका उत्साही त्यांच्यात होता. सूर्योदय बघायची उत्सुकता होती. पण सूर्य अगदी क्षितिजावर जाऊन अस्तंगत न होता थोडा वरच बुडाला असं वाटलं.
लांब डावीकडे नाणेघाटावरील अंगठा ओळखता आला आणि जरा अलीकडे खालच्या अंगाला माळशेज घाटाचा रखवालदार, मोरोशीचा भैरवगड दिसला. मात्र लांबचं स्पष्ट दिसत नसलं तरी आमची वैयक्तिक छायाचित्रं खूप छान आली. सूर्यास्तानंतर पटकन अंधार पडला. घरात गरम गरम जेवण बनायला सुरुवात झाली होती. त्यात आमच्या ग्रुपमधीलअर्पिता देसाई यांनी सगळ्यांसाठीच्या पोळ्या लाटून दिल्या. सगळ्यांनी मस्त जेवण केलं. आकाशात अक्षरशः चांदण्यांच्या लाह्या विखुरल्या होत्या. असं आकाश फार वर्षांनी पाहीलं. मृग नक्षत्र डोक्यावरच होतं. ते चांदण्यांनी लगडलेलं आकाश पाहून जणू काही माझी नजरबंदी झाली होती. जेवण झाल्यावर लवकर झोपायचं ठरलं. पण तंबूत झोप येईल असं वाटत नव्हतं. आम्ही झोपडीत झोपणं पसंत केलं. घरात आपण किती ऐशआरामत झोपतो, इथे खाली एक मॅट आणि पांघरायला चादर, तीन ब्लँकेट घेऊनहीअंग शहारत होतं. इतकी सहज झोप थोडीच लागणार? कसं काय राहतात इथले लोक असं वाटलं. वातावरणात खरंच कौतुक वाटलं.
सकाळी लवकर उठून चहा आणि कांदे पोह्यांची न्याहारी करून सगळ्यांनी खाली पाचनाईसाठी उतरायची वाट धरली. वाटेत पुन्हा हरिश्चंद्रेश्वर मंदिरात थांबून फोटो काढले आणि उतरायला सुरुवात केली. आतामात्र पोटात मोठ्ठा गोळा आला होता. उतरताना पाय घसरत होते. सगळे आपापल्या वेगानं उतरत होते. आता अर्पिता माझी गाईड होत्या. सागरलाही माझी काळजी आणि जबाबदारी असल्यानं आम्ही तिघं माझ्या वेगानं हळूहळू उतरत होतो. इतका सुंदर निसर्ग भोवती होता. पक्षी मस्त किलबिल करत होते, पण मला मात्र फक्त दगड दिसत होते. डावा पाय टाकू की उजवा. अर्पिता मला सूचना देत होत्या. ”मी बघ कसा पाय टाकतेय तसा अडवा पाय टाक.” मला डावा-उजवाही हळूहळू कळेना असं झालं.
शेवटच्या अर्ध्या तासात मात्र माझं अवसान गळत चाललं होत. अर्पिता आणि सागर मला प्रोत्साहन देत होते. सागरनं ORSचं पाणी प्यायला दिलं. मला जरा बरं वाटलं. चालून पाय दमले होते. आम्हाला शोधत विजय वाठारे वर आले आणि अक्षरशः लहान बाळासारखा हात धरून मी खाली आले. त्यांच्या हाताची सऱ्हाईत मजबूत पकड जाणवत होती. जणू देवाच भेटला असं मला वाटलं. वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी माणूस किती खंबीर नेतृत्व करू शकतो हे पाहून कौतुक वाटलं. उतरताना कष्ट झाले, पण समोर जीप दिसल्यावर आत स्वतःला झोकून देत निसर्गाचे आभार मानले. सागर, अर्पिता आणि विजय सर यांच्या आणि सर्व नवीन मित्रांच्या बरोबर माझा पहिला वहिला ट्रेक पार पडला. धन्यवाद सागर,अर्पिता आणि विजय. या ट्रेकनं मला खूप काही शिकवलं. पायांची पकड किती मजबूत असायला हवी, मनोधैर्य मजबूत असायला हवं, आपण ठरवलं तर कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो ही गोष्ट जगण्याची उमेद वाढवते.
दुपारी एक वाजेपर्यंत खाली गावात आलो. सरपंचांच्या घरात त्यांच्या आईनं मस्त गरम जेवण आणि गोडाचा शिरा बनवला होता. जेवण झाल्यावर लगेचच आम्ही आमच्या जीपनं कसारा गाठण्यासाठी प्रवास सुरू केला. वाटेत मात्र राजूर येथील प्रसिद्ध पेढे विकत घ्यायला न विसरता थांबलो. दुपारी साडेचार वाजता कसारा स्टेशनवर येऊन आम्ही मुंबईची लोकल पकडली.






