Home » निवडणूक » महापौर, उपमहापौर पद निवडणुकीसाठी ‘या’ दिवशी विशेष सभा

महापौर, उपमहापौर पद निवडणुकीसाठी ‘या’ दिवशी विशेष सभा

Facebook
Twitter
WhatsApp
21 Views

महापौर, उपमहापौर पद निवडणुकीसाठी ‘या’ दिवशी विशेष सभा

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.

या सभेत स्थायी समितीसह विविध ५ विशेष समित्यांच्या सदस्यांची देखील नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.

या पदासह उपमहापौर पदाची निवड विशेष सभेत केली जाणार आहे. याबाबत पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या स्वाक्षरीने आदेश जारी करण्यात आले आहेत. या सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून सहकार आयुक्त दिपक तावरे काम पाहणार आहेत.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी विशेष सभा बोलावली जाते. यानुसार पालिकेची विशेष सभा ६ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. या सभेत महापौर व उपमहापौर यांच्यासह स्थायी समिती व विविध ५ विशेष समितीच्या सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

महापौर व उपमहापौर पदासाठीनामनिर्देशन पत्राचे छापील फॉर्म्स पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या नगरसचिव कार्यालयात कार्यालयीन वेळेत मिळतील. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याकरिता सोमवार, दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ ते ५ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. नामनिर्देशन पत्र नगरसचिव कार्यालयात विहित वेळेत स्वीकारली जाणार आहेत, असे नगरसचिव मुकेश कोळप यांनी सांगितले.

स्थायी समितीवर १६ तर विशेष समितीवर ९ सदस्यांची केली जाणार नियुक्ती

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीवर १६ सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच विविध ५ विशेष समित्यांवर प्रत्येकी ९ सदस्यांची निवड देखील ६ फेब्रुवारी रोजी आयोजित विशेष सभेत करण्यात येणार आहे.

विशेष समितीवर सदस्यांच्या नियुक्ती करताना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार पक्षांच्या किंवा गटाच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण समितीवर कमीतकमी ७५ टक्के सदस्य महिला सदस्यांमधून नियुक्त केले जाणार आहेत, अशी माहिती नगरसचिव मुकेश कोळप यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!