कधी पंतप्रधान मोदींसोबत, तर कधी प्रमुख पाहुण्यांना माहिती देताना दिसलेला हा तरुण कोण?
भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन सोमवारी देशभरात उत्साहात साजरा झाला. प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम राजधानी नवी दिल्लीमध्ये संपन्न झाला. यावेळी भारताच्या सैन्यदलांनी शस्त्रास्त्रांसह आपल्या सैन्यशक्तीचं प्रदर्शन केलं तर विविध मंत्रालये आणि राज्यांच्या चित्ररथांमधून देशाचा विकास आणि सांस्कृतिक वारशाचं प्रदर्शन करण्यात आलं.
या कार्यक्रमादरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंचावर उपस्थित असलेल्या परदेशी पाहुण्यांना एक तरुण कर्तव्य पथावर सुरू असलेल्या संचालनातील विविध गोष्टींची माहिती सातत्याने देताना दिसत होता. कधी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बोलताना तर कधी परदेशी प्रमुख पाहुण्यांना समजावून सांगत असलेला हा तरुण कोण असा प्रश्न प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला आहे.
या तरुणाचं नाव आहे सिद्धार्थ बाबू. सिद्धार्थ बाबू हे भारतीय परदेश सेवेच्या २०१७ च्या बॅचचे अधिकारी आहेत. तसेच ते प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचालनावेळी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होते. सिद्धार्थ बाबू हे कधी युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वॅन डेर लेन यांच्याशी बोलताना दिसत होते. तर कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संवाद साधत होते. ते पंतप्रधान मोदी आणि प्रमुख पाहुण्यांमध्ये अनुवादक म्हणून काम करत असल्याचे काही वेळाने प्रेक्षकांच्या लक्षात आले. मात्र तोपर्यंत ते कोण आहेत आणि त्यांचं नाव काय आहे, याची माहिती कुणालाच नव्हती.दरम्यान, सिद्धार्थ बाबू हे परराष्ट्र मंत्रालयामध्ये अंडर सेक्रेटरी या पदावर कार्यरत आहेत. तसेच ते शिष्टाचार आणि अनुवादाच्या कामामध्ये नेहमी सहभागी असतात. सिद्धार्थ बाबू यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित मिडल्युरी इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीज, मॉन्टेरे येथून भाषेचं शिक्षण घेतलं आहे. तसेच या संस्थेमध्ये केवळ भाषाच नव्हे तर मुत्सद्देगिरी आणि डिप्लोमॅटिक शिष्टाचाराचंही शिक्षण दिलं जातं.
कोची येथील रहिवासी असलेल्या सिद्धार्थ बाबू यांनी २०१६ मध्ये आपल्या दुसऱ्या प्रयत्नामध्ये यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. तसेच त्या परीक्षेत त्यांनी देशभरातून १५ वा क्रमांक पटकावला होता. त्यानंतर त्यांनी परराष्ट्र सेवेची निवड केली होती.






