‘दिल चाहता है’ सिनेमा नाकारलेला, आज अभिनेत्रीला होतोय पश्चाताप; कारण सांगत म्हणाली…
‘दिल चाहता है’ हा २००१ साली आलेला सिनेमा बॉलिवूडमधील कल्ट सिनेमांपैकी एक आहे. आमिर खान, अक्षय खन्ना, सैफ अली खान, प्रिती झिंटा, डिंपल कपाडिया, सोनाली कुलकर्णी अशी तगडी स्टारकास्ट यामध्ये होती.
तीन मित्रांची ही कहाणी आजही प्रेक्षकांना आपलीशी वाटते. तसंच सिनेमातील गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. दरम्यान एका अभिनेत्रीला तेव्हा या सिनेमाची ऑफर मिळाली होती. मात्र तिने हा चित्रपट नाकारला. कोण आहे ती अभिनेत्री?
ही अभिनेत्री आहे ‘खल्लास गर्ल’ ईशा कोप्पिकर. बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत ईशा कोप्पिकर म्हणाली, “मला ‘दिल चाहता है’ची ऑफर होती. तो सिनेमा न करणं याचा आज मला खूप पश्चाताप होतो. मी तेव्हा ‘प्यार इश्क और मोहोब्बत’ सिनेमा करत होते. सिनेमाच्या दिग्दर्शकाला मी आरामात सांगू शकले असते की मला ‘दिल चाहता है’ सिनेमा करायचा आहे. त्यामुळे मी तुमचा सिनेमा साईन केला असला तरी मला तोही सिनेमा करायचा आहे. किंवा मला तुमचा सिनेमा सोडावा लागेल असं तरी मी म्हणायला हवं होतं. पण तेव्हा मला मार्गदर्शन करायला कोणीच नव्हतं. तसंच माझी तत्वं इतकी आहेत जी मला आईबाबांकडूनच मिळाली आहेत की एकदा का कोणाला शब्द दिला की तो मागे घ्यायचा नाही… या कारणामुळे मी त्या सिनेमाच्या दिग्दर्शकांना काहीच बोलू शकले नाही. मी चूपचाप त्यांचा सिनेमा केला आणि ‘दिल चाहता है’ला नकार दिला. पण आज असं वाटतं की यार मी काहीतरी जुगाड करायला हवा होता. दुर्दैवाने ‘प्यार इश्क मोहोब्बत’ सिनेमा चालला नाही आणि ‘दिल चाहता है’ कल्ट सिनेमा बनला.”
ईशा कोप्पिकर पुढे म्हणाली, “शेवटी नशिबात असतं तेच होतं. कधी कधी असं होतं की एखाद्या प्रोजेक्टमधून मला रिप्लेस केलं जातं. कारण कदाचित त्यांना माझ्यापेक्षा जास्त टॅलेंटेड, जास्त सुंदर अभिनेत्री मिळाली असेल. त्यामुळे जे नशिबात आहे हे तुम्हाला आज किंवा उद्या मिळतंच.”






