पुण्यात पार्किंगवरून राडा! सुऱ्यांनी वार, लाकडांनी मारहाण; एकाच वस्तीतील दोन कुटुंबात जुंपली
पुणे: पार्किंगच्या वादातून सुरू झालेला (Pune Crime) किरकोळ वाद थेट हिंसाचारात बदलल्याची घटना पुण्यातील बंडगार्डन परिसरात घडली असून, सार्वजनिक जेवणाचा कार्यक्रम सुरू असतानाच दोन गट एकमेकांवर तुटून पडल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.
या घटनेत महिलांसह अनेक जण जखमी झाले असून, बंडगार्डन पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारींच्या आधारे एकूण 15 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये 5 महिलांचा समावेश आहे. (Latest Marathi News)
ही घटना 25 जानेवारी रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास प्रायव्हेट रोड, ताडीवाला रोड परिसरातील लुंबिनीनगर येथे घडली. एका घरातील सार्वजनिक जेवणाचा कार्यक्रम सुरू असताना पार्किंगवरून वाद झाला. हा वाद पाहता पाहता इतका चिघळला की दोन्ही बाजूंनी एकमेकांवर खुर्च्या, ताटे, जाळण्यासाठीची लाकडे आणि हत्यारांनी हल्ले करण्यात आले.
एका बाजूने अजय भालशंकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांच्या भावंडांवर आणि पत्नीवर मारहाण करत गंभीर जखमा केल्या. या झटापटीत दुचाकीचेही नुकसान करण्यात आले. दुसरीकडे, सोनू काळे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत भालशंकर कुटुंबातील सदस्यांनी तसेच महिलांनी मिळून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या झटापटीत काही जणांच्या डोक्याला, डोळ्याजवळ, पाठीवर आणि छातीवर दुखापती झाल्या असून, काहींवर हत्याराने वार झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जेवणाच्या कार्यक्रमात अचानक झालेल्या या हिंसाचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बंडगार्डन परिसरात आधीच दाट वस्ती आणि वाहतुकीचा ताण असताना अशा प्रकारच्या घटना कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतात, अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.






