Home » राजकारण » आठ वर्षांनंतरची सांगली जिल्हा परिषद निवडणूक; भाजपसमोर सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान

आठ वर्षांनंतरची सांगली जिल्हा परिषद निवडणूक; भाजपसमोर सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान

Facebook
Twitter
WhatsApp
69 Views

आठ वर्षांनंतरची सांगली जिल्हा परिषद निवडणूक; भाजपसमोर सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान

 

सांगली : तब्बल आठ वर्षांनंतर होत असलेल्या सांगली जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. गतवेळी २७ जागांसह सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपसमोर यंदा सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकांनंतर जिल्ह्यात निर्माण झालेली नवी राजकीय समीकरणे या निवडणुकीच्या निकालावर प्रभाव टाकणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. मागील निवडणुकीत जत आणि मिरज तालुक्यांनी भाजपला भक्कम साथ दिली होती. मात्र, याच दोन तालुक्यांत यंदा काँग्रेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडीने भाजपसमोर तुल्यबळ आव्हान उभे केले आहे.

तासगाव-कवठेमहांकाळमध्ये माजी खासदार संजय पाटील, तर आटपाडी व खानापूरमध्ये आमदार सुहास बाबर यांचे भाजपसमोर आव्हान आहे. त्यामुळे केवळ निकालच नव्हे, तर निवडणुकीनंतर होणारी जुळवाजुळवही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी केवळ दोन दिवसांचा प्रचार कालावधी शिल्लक राहिला आहे. भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यंदा अधिक पद्धतशीर रणनीती आखल्याचे दिसून येते. सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीत शिंदे गटाची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचीही अप्रत्यक्ष युती असल्याने भाजपसमोर आव्हान अधिक तीव्र झाले आहे. भाजपला मित्रपक्षांबरोबरच बदललेल्या राजकीय समीकरणांचा सामना करावा लागत आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६१ गट व पंचायत समितीचे १२२ गण आहेत. गुरुवारी (ता. ५) प्रचाराची सांगता, शनिवारी (७) मतदान, तर सोमवारी (९) मतमोजणी होणार आहे. भाजप गतवेळी स्वबळावर महापालिकेत सत्तेत होता; मात्र अलीकडील निवडणुकीत भाजपच्या दोन जागा कमी झाल्याने बहुमतासाठी राष्ट्रवादीची साथ घ्यावी लागली होती.

२०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप २७ जागांसह सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. शिवसेनेचे तीन, घोरपडे गटाचे दोन, रयत विकास आघाडीचे चार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक अशा दहा सदस्यांच्या पाठिंब्यावर भाजपने सत्ता स्थापन केली होती. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच भाजपचा अध्यक्ष जिल्हा परिषदेत विराजमान झाला होता.

यंदा सभागृहाची मुदत संपल्यानंतर तब्बल चार वर्षांनी ही निवडणूक होत आहे. भाजपने ६१ पैकी ५० जागांवर उमेदवार दिले असून, सत्तेसाठी आवश्यक असलेला ३१ चा आकडा गाठण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत. वाळवा तालुक्यात भाजपने अजित पवार गटाची राष्ट्रवादी, शिंदे गटाची शिवसेना, रयत क्रांती आघाडी, तसेच काँग्रेसलाही काही जागा सोडल्या आहेत.

भाजपला मागील निवडणुकीत वाळवा व शिराळा तालुक्यात खाते उघडता आले नव्हते; तर कवठेमहांकाळमध्ये दोन जागा मिळाल्या होत्या. जत व मिरज तालुक्यांच्या बळावरच भाजपची सत्ता शक्य झाली होती. यंदा भाजपची भिस्त पुन्हा जत व मिरजवर असेल. मात्र, शिराळ्यात आमदार सत्यजित देशमुख भाजपसाठी नवी आशा ठरू शकतात.

वाळवा, पलूस, कडेगाव, खानापूर व आटपाडी तालुक्यांत भाजपसमोर काँग्रेसचे कडवे आव्हान आहे. याच पट्ट्यात महाविकास आघाडीने मोठी भिस्त ठेवली आहे. तासगावमध्ये संजय पाटील यांचा भाजपशी दुरावा ‘महाविकास’साठी ‘बोनस’ ठरू शकतो.

खासदार विशाल पाटील यांनी मिरज तालुक्यात लक्ष घातल्याने सांगली-मिरजमधील दोन्ही आमदारांसमोर आव्हान आहे. निवडणुकीनंतर शिंदे शिवसेना व अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांची भूमिका महापालिकेप्रमाणेच निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.

२०१७ च्या निवडणुकीतील बलाबल

(एकूण जागा : ६०)

भाजप : २७

राष्ट्रवादी : १४

काँग्रेस : ९

शिवसेना : ३

रयत विकास आघाडी : ४

घोरपडे गट : २

स्वाभिमानी शेतकरी संघटना : १

२०२६ निवडणूक : पक्ष व लढविलेल्या जागा

भाजप : ५० (कमळ)

काँग्रेस : २५

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) : ३१ (घड्याळ)

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) : ३२ (तुतारी)

शिवसेना (एकनाथ शिंदे) : ३२ (धनुष्यबाण)

जनसुराज्य शक्ती पक्ष : ६ (नारळाची बाग)

रयत क्रांती संघटना : १ (कप-बशी)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) : १ (मशाल)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!