म्हाडाच्या सेवानिवृत्त अभियंत्याची सुमारे ४ कोटींची फसवणूक, बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याचीही धमकी
ठाणे : म्हाडाच्या ६२ वर्षीय सेवानिवृत्त अभियंत्याची गुंतवणूकीत चांगला परतावा मिळेल असे सांगून सुमारे चार कोटी रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुंतवणूकीसाठी त्यांनी सहकारी पतपेढीतून कर्ज काढले होते.
परतावा मिळत नसल्याने त्यांनी पैसे मागितले असता, त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील देण्यात आली. याप्रकरणी फसवणूक झालेल्या सेवा निवृत्ताने ऑनलाईन तक्रार दिल्यानंतर वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फसवणूक झालेल्या व्यक्तीला १७ जुलै २०२५ ला व्हाॅट्सॲप क्रमांकावर काॅल आला. एक महिला समोरून काॅलवर बोलत होती. तिने त्यांना आंतरराष्ट्रीय ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल असे सांगितले. त्यानंतर महिलेने त्यांना एक व्हाॅट्सॲप लिंक पाठवून त्याआधारे त्यांचे खाते उघडण्यास सांगितले. सुरुवातीला त्यांना विश्वास बसत नव्हता. परंतु महिलेने त्यांना प्रेमावर विश्वास असेल तर गुंतवणूक करा असे म्हणाली. त्यामुळे त्यांनी त्या लिंकवर क्लिक करून ट्रेडिंगचे खाते उघडले. महिलेच्या सांगण्यानुसार त्यांनी टप्प्याटप्प्याने थोडेफार पैसे गुंतविले. त्यावर त्यांना चांगला नफा झाल्याचे त्या खात्यावरून दिसून आले.
गुंतवणूकीवर नफा मिळत असल्याचे दिसत असल्याने महिलेने त्यांना आणखी गुंतवणूक करण्यास सांगितली. त्यामुळे त्यांनी सहकारी पतपेढीतून कर्ज काढून एकूण ३ कोटी ९५ लाख ७७ हजार ७९४ रुपये गुंतुवणूक केली. आता परतावा काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना ते पैसे काढता येत नव्हते. याबाबत त्यांनी महिलेला विचारले असता, ती त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून त्यांना अश्लील संदेश, छायाचित्र पाठवू लागली.
तसेच त्यांचे देखील छायाचित्र तिने मागवून घेतले. नाइलाजास्तव त्यांनी त्यांचे छायाचित्र तिला पाठविले. त्यानंतर एका व्यक्तीने त्यांना बलात्काराची खोटी तक्रार दाखल करु असे धमकाविण्यास सुरुवात केली. बदनामी नको असेल तर दोन कोटी रुपये द्या अशी मागणी देखील त्याने केली. या घटनेनंतर फसवणूक झालेली व्यक्ती घाबरली. अखेर काही दिवसांनी त्यांनी ऑनलाईन तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाला आहे.






