Home » राजकारण » आमचा पाठिंबा गृहीत कसा धरला? आमचा निर्णय ठरविणारे भाजप कोण? शंभूराज देसाईंचा कोणाला उद्देशून इशारा

आमचा पाठिंबा गृहीत कसा धरला? आमचा निर्णय ठरविणारे भाजप कोण? शंभूराज देसाईंचा कोणाला उद्देशून इशारा

Facebook
Twitter
WhatsApp
36 Views

आमचा पाठिंबा गृहीत कसा धरला? आमचा निर्णय ठरविणारे भाजप कोण? शंभूराज देसाईंचा कोणाला उद्देशून इशारा

 

सांगली : महापालिका निवडणुकीत (Sangli Zilla Parishad Result) भाजपने घेतलेल्या सोयीस्कर भूमिकेचा विचार करून आम्ही जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेबात आमचे आम्ही ठरवूच; परंतु सत्ता स्थापनेबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी कोणतीची चर्चा झालेली नाही.

त्यांनी आमचा पाठिंबा गृहीत कसा धरला? गरज भासली की त्यांच्याकडून अशा चर्चा होतात; पण आमचा निर्णय ठरविणारे भाजप कोण? आम्ही स्वतंत्र लढलो आहे, असे शिवसेनेचे नेते, जिल्हा संपर्कप्रमुख शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

सांगली येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती नूतन सदस्यांचा सत्कार मंत्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंत्री देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, ‘महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने १० जागा देण्याचे जाहीर केले. नंतर शेवटी ‘सॉरी’ म्हणत दोन जागा देऊ, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. पण, ‘एका लुगड्याने बाई म्हातारी होत नसते’, हे निवडणूक निकालानंतर भाजपला कळले. अती तिथं माती झाली. त्यानंतर सत्ता स्थापनेबाबत आमच्याबरोबर बोलणे झाले. पण, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला बरोबर घेण्यात आले. हा पक्षदेखील महायुतीतील घटक पक्ष आहे.

आम्हाला काही अडचण नाही. पण, नगरपालिका व महापालिका निवडणुकीत महायुतीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत टोकाची भूमीका घेऊ नये, असे जाहीर केले होते. ते भाजपकडून सांगली महापालिकेसाठी पाळले गेले नाही. हा अनुभव आता शिवसेनेला आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तेत भाजपबरोबर सहभागी व्हायचे की नाही? याचा निर्णय शिवसेना सर्वांनुमते घेणार आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी जिल्हा परिषद सत्तेबाबत कोणतेही बोलणे झालेले नाही. भाजपची भूमीका सोयीस्कर असते. त्यामुळे आमची भूमिका त्यांनी ठरवू नये. गरज भासली की आमच्याबरोबर चर्चा होते. आमचा निर्णय हा स्थानिक पातळीवर मते ऐकून नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातला जातो, तेथून निर्णय होतो.’ यावेळी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, मोहन वनखंडे, गौरव नायकवडी, नगरसेवक युवराज बावडेकर आदी उपस्थित होते.

सोमवारी निर्णय घेऊ

मंत्री देसाई म्हणाले, ”जिल्हा परिषदेच्या सत्तेत महायुती करायची की महाविकास आघाडीबरोबर जायचे? याबाबतची मते नूतन जिल्हा परिषद सदस्यांकडून घेतली जाणार आहेत. त्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्‍यांची मते जाणून घेतली जातील. याचा संपूर्ण अहवाल तयार करून मी व आमदार सुहास बाबर सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत. अहवाल त्यांच्यासमोर मांडला जाईल. त्यानंतर सत्तेचा निर्णय होईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!