वारजे (प्रतिनिधी) : मराठी भाषेचा प्रसार व संवर्धन हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख ध्येय आहे, आणि त्याच ध्येयपूर्तीसाठी खडकवासला मतदारसंघात एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला — ‘मराठी प्रशिक्षण वर्ग’.
हा उपक्रम खास अमराठी नागरिकांसाठी राबवण्यात आला असून, या वर्गाचा पहिला वर्ग आज, १३ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता वारजे माळवाडी परिसरात पार पडला. विशेष म्हणजे, अमराठी नागरिकांनी स्वेच्छेने सहभागी होत मराठी शिकण्याचा निर्धार व्यक्त केला.
या वर्गाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रख्यात साहित्यिक प्रा. वी. दा. पिंगळे यांनी उपस्थित नागरिकांना दैनंदिन व्यवहारात वापरली जाणारी मराठी शब्दसंपदा, साधी वाक्यरचना आणि योग्य उच्चार यावर प्रभावी मार्गदर्शन केले. संवादात्मक शैलीत त्यांनी मराठी शिकण्यास प्रोत्साहन दिले आणि वर्गात उत्साही वातावरण निर्माण केले.
कार्यक्रमाला माजी नगरसेविका सौ. भाग्यश्रीताई दांगट, मनसे पुणे शहर उपाध्यक्ष कैलासभाऊ दांगट, नितीन वांजळे, अनिकेत गुंजाळ, विशाल पठारे तसेच स्थानिक मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते व मराठीप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन खडकवासला उपविभाग अध्यक्ष गौरव दांगट, शाखा अध्यक्ष रियाज शेख आणि शाखा अध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी केले.
“आमच्या परिसरात राहणारे अनेक अमराठी बांधव मराठी शिकण्याची इच्छा व्यक्त करतात. मात्र, योग्य संधी किंवा मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे ते शक्य होत नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या सोयीसाठी हा वर्ग सुरू केला आहे. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती सामाजिक एकात्मतेचा मूलभूत दुवा आहे,” असे जनसेवक कैलासभाऊ दांगट यांनी सांगितले.
मनसेच्या या सामाजिक उपक्रमामुळे अमराठी बांधवांमध्ये मराठी शिकण्याचा आत्मविश्वास वाढीस लागला आहे. हा वर्ग दर आठवड्याला घेतला जाणार असून, अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.