566 Views
“शिरूर-पुणे महामार्ग आज केवळ ‘महामार्ग’ उरलेला नाही, तर तो ‘महाभयंकर मार्ग’ बनला आहे,” अशा ठाम शब्दांत एका त्रस्त नागरिकाने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार यांना उद्देशून लिहिलेलं एक भावनिक पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या पत्रात संबंधित नागरिकाने महामार्गावरील वाढती वाहतूक, मोठमोठे खड्डे, अपूर्ण नियोजन आणि नागरिकांच्या जिवाला होणारा धोका अधोरेखित केला आहे. “आपण या महामार्गाची घोषणा मागील अर्थसंकल्पात केली होती, मात्र प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेलं नाही,” असा थेट सवाल पत्रातून विचारण्यात आला आहे.
विशेषतः नियोजित उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होण्यापूर्वी पर्यायी मार्गांची व्यवस्था न झाल्यास वाहतूक पूर्ण ठप्प होईल, शेकडो अपघात आणि जीवितहानी होण्याचा धोका निर्माण होईल, याची जाणीवही या पत्रात करून देण्यात आली आहे.