शिक्रापूर (ता. शिरूर) : गुरुवार दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी ९ व्या दिवसाच्या गणेश विसर्जन मिरवणुका सुरू असताना शिक्रापूर पोलिसांनी विनापरवाना डॉल्बी साऊंडसह काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर कारवाई केली आहे.
मौजे सणसवाडी येथील सराटेवस्तीमध्ये गुरूदत्त तरुण गणेशोत्सव मंडळाने डॉल्बी साऊंड लावून विनापरवाना मिरवणूक काढत सार्वजनिक उपद्रव केल्याने पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले. या प्रकरणी मंडळाचे अध्यक्ष सागर दिलीप हरगुडे (२८, रा. सराटेवस्ती, सणसवाडी) आणि डॉल्बी सिस्टीमचा मालक महेश अनिल गुंडगळ (२५, रा. भोसे, ता. खेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशनचे गोपनीय अंमलदार पोहवा एस. ए. कारंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजि. नं. ५८७/२५ भा.नाग.सु.सं. (BNS) २०२३ चे कलम २९२, २९३ प्रमाणे नोंदवला आहे. तपास पोहवा आर. डी. मळेकर करीत आहेत. आरोपींना बी.एन.एस.एस. ३५(३) नोटीस देऊन सोडण्यात आले असून डॉल्बी सिस्टीमची गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
शिक्रापूर पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी सांगितले की, सदर कारवाईनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नसून पोलिस स्टेशन हद्दीत शांतता आहे.