महाराष्ट्रात पुढील ७२ तास अतिमुसळधार पावसाचा इशाराः गरज असेल तरच घराबाहेर पडा; या जिल्ह्यांना अलर्ट
सावभौम न्युज समूह
मुंबई (प्रतिनिधी) :महाराष्ट्रातील वातावरणात पुन्हा एकदा मोठा बदल झाला असून, पुढील तीन ते चार दिवस राज्यात मान्सूनचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता
पुढील २४ तासांत पश्चिम महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांसाठी विशेष इशारा देण्यात आला आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर, कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. सोलापूरमध्येही जोरदार पावसाची शक्यता असून, यामुळे या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’
पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ‘यलो’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन ते चार दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असला तरी, पुढील तीन दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. याचा अर्थ, पुणे शहर आणि घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सोलापूर आणि धाराशिवमध्ये पावसाचे पुनरागमन
सोलापूर शहरात आज पुन्हा एकदा पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत. साखर पेठ, मंगळवार बाजार आणि गणेश शॉपिंग सेंटर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
धाराशिव जिल्ह्यातही पावसाने आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. धाराशिव, तुळजापूर आणि येरमाळा परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र, हा अचानक आलेला पाऊस शेतीसाठी हानिकारक ठरू शकतो. काढणीला आलेल्या पिकांना या पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
पुढील हवामानाचा अंदाज
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस राज्यात ढगाळ वातावरण कायम राहील. अनेक भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी, तर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक पाऊस येण्याची शक्यता असल्याने, नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊनच आपली कामे करावीत, असेही सांगण्यात आले आहे.