दुबार-तिबार मतदारांना नगरपरिषदेनंतर झेडपी, महापालिकेच्या मतदार यादीत नाव असल्यास तेथेसुद्धा करता येणार मतदान; काय आहे नेमका नियम? वाचा…
सोलापूर : राज्यात अंदाजे २० लाख दुबार- तिबार मतदार आहेत. त्यातील अनेकांची नावे महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार असल्याने ते मतदार सगळीकडे मतदान करू शकतील.
कारण, ज्या त्या निवडणुकीवेळी अंतिम केलेल्या मतदार यादीत त्या मतदाराचे नाव असेल तर तो त्याठिकाणी मतदान करू शकतो, असा नियम आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्यात ६८ हजारांवर दुबार मतदार असल्याची बाब समोर आली आहे.
राज्यात पहिल्या टप्प्यात २७९ नगरपरिषद, नगरपंचायत व नगरपालिकांची निवडणूक होत आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा व एक नगरपंचायत आहे. या टप्प्यात राज्यातील एक कोटी सात लाख तीन हजार ५७६ मतदार आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील चार लाख ४३ हजार ६०५ मतदार आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये ११ हजार ५१४ दुबार मतदार आहेत. तर जिल्हा परिषदेसाठी एकूण २४ लाख ८८ हजार २८२ मतदार आहेत. त्यातही तब्बल ३८ हजार ९०९ दुबार मतदार आहेत. या दुबार मतदारांमध्ये काहीजण स्थलांतरित आहेत. तर काही जणांची जिल्ह्यातच शहर व ग्रामीणमध्ये मतदार म्हणून नोंद आहे. दुबार मतदारांचा विषय सध्या सर्वच विरोधी पक्षांच्या अजेंड्यावर आहे.


दुबार मतदार बोगस मतदान करणार नाहीत याची प्रशासकीय पातळीवर विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. परंतु, पहिल्यांदा नगरपालिकेसाठी मतदान केलेला मतदार, ज्याचे नाव ग्रामीण मतदार यादीमध्येही आहे तो जिल्हा परिषदेसाठीही मतदान करू शकेल. तर त्याच मतदाराचे नाव महापालिकेच्या मतदार यादीतही असेल तर तो तेथेही मतदान करू शकणार आहे. म्हणजे ज्याची दुबार व तिबार मतदार म्हणून नोंद आहे, तो तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान करू शकणार आहे.
दुबार-तिबार मतदारांपर्यंत जाऊन त्यांच्याकडून लेखी घेतले जाईल
नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील दुबार/ तिबार मतदारांची यादी आमच्याकडे प्राप्त झाली आहे. त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन आमचे कर्मचारी तो मतदार कोणत्या वॉर्डात मतदान करणार आहे, हे विचारेल. मतदाराच्या इच्छेनुसार त्याची त्याठिकाणी नोंद केली जाईल. त्याचवेळी तो संबंधित वॉर्डात मतदान करणार असल्याचे त्याच्याकडून लिखित स्वरूपात घेतले जाणार आहे.
– योगेश डोके, प्रशासन अधिकारी, नगर विकास, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील दुबार मतदार
स्थानिक स्वराज्य संस्था दुबार मतदार
नगरपरिषदा ११,५१४
जि. प., पंचायत समिती ३८,९०९
महापालिका अंदाजे १८,०००
एकूण ६८,४२३
दुबार मतदारांबाबत अधिकारी म्हणतात…
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये एकच मतदारयादी असते. त्यामुळे या निवडणुकांमध्ये मतदाराला एकच मत टाकता येते. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे टप्पे असतात. त्यामुळे ज्या मतदाराचे नाव शहरी व ग्रामीण मतदार यादीमध्ये असेल तो दोन्हीकडे मतदान करू शकतो. ज्या त्या निवडणुकांमध्ये मतदार यादीत नाव असलेला व्यक्ती त्या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावू शकतो, आता नियम असल्याचे जिल्हा निवडणूक शाखांमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.





