मुंबईहून विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात; १४ वर्षांच्या मुलीसह चौघांचा मृत्यू
पंढरपूर : मंगळवेढ्याजवळ एक भीषण अपघात झाला असून देवदर्शनासाठी निघालेल्या मुंबईच्या भाविकांच्या क्रुझर गाडीला एका मालवाहतूक ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात चार भाविकांचा मृत्यू झाला असून, त्यात तीन महिला आणि एका १४ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.
इतर पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात २६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता पंढरपूर ते सोलापूर महामार्गावर शरद नगर, मल्लेवाडी येथे झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची क्रुझर गाडी मंगळवेढा मार्गे जात होती. ढेकळेवाडी गावाजवळ समोरून येणाऱ्या एका कंटेनर ट्रकने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने चुकीच्या दिशेने येऊन क्रुझर जीपला धडक दिली. या धडकेमुळे क्रुझर गाडी रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली. अपघाताचे कारण ट्रक चालकाचा निष्काळजीपणा आणि हयगय असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.या भीषण अपघातात योगिनी केकाणे, सोनम अहिरे, आदित्य गुप्ता आणि सविता गुप्ता या चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला. अंजली यादव, सोहम घुगे आणि इतर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने मंगळवेढा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कंटेनर ट्रकचा क्रमांक एचएच ४६BU – ६६५१ आहे. या ट्रकचा चालक युवराज यशवंत गळवे याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र पोलिसांनी ती सुरळीत केली.






