टायगर पॉईंटजवळ सॅक; दरीत आढळला मृतदेह, मुंबईतील महाविद्यालयीन तरुणीबाबत नेमकं काय घडलं?
पिंपरी : लोणावळा येथे सोलो ट्रेक करण्यासाठी आलेल्या विधी शाखेच्या (लाॅ) विद्यार्थिनीचा खोल दरीत मृतदेह आढळून आला. लोणावळा येथील टायगर पाॅईंटवर रविवारी (दि. १ फेब्रुवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
श्रेया नरेंद्र पती (वय २०, रा. सीबीडी बेलापूर, मुंबई), असे मृतदेह आढळलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेया ही नामांकित महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेत होती. श्रेयाचे वडील सनदी लेखापाल (सीए) असून आई गृहिणी आहे. तर भावाचे परदेशातून शिक्षण पूर्ण झाले आहे. श्रेयाला फिरण्याची आवड होती. दरम्यान, शनिवारी (दि. ३१ जानेवारी) ती लोणावळा येथे ‘सोलो ट्रेक’साठी आली. लोणावळ्यातील काही पर्यटनस्थळांना तिने भेट दिली. त्यावेळी लोणावळा येथील ‘ड्यूक्स नोज’ येथून दुपारी रिक्षाने टायगर पाॅईंट येथे गेली. तेथे एका टपरीजवळ काही जणांना श्रेयाची पिशवी (सॅक) मिळून आली. पिशवीमध्ये ओळखपत्र, मोबाइल, लॅपटाॅप मिळून आला. त्यावरून पोलिसांनी श्रेयाच्या नातेवाईकांशी संपर्क साधला.
श्रेयाच्या नातेवाईकांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे धाव घेतली. श्रेया बेपत्ता झाल्याची नोंद केली. तिचा शोध घेतला असता, दरीत श्रेयाचा मृतदेह आढळून आला. तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह हलविण्यात आला. तेथे श्रेया हिचा भाऊ निशांत यांनी मृतदेहाची ओळख पटवली. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे तपास करीत आहेत.
‘दुर्गा’ने घेतला शोध
श्रेयाचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या श्वान पथकातील दुर्गा या श्वानाला पाचारण करण्यात आले. पथकातील पोलिस अंमलदार सागर रोकडे यांनी दुर्गा श्वानाच्या मदतीने दरीत शोध सुरू केला. श्रेयाच्या पिशवीतील रुमालावरून दुर्गा श्वानाने माग काढत खोल दरीत मृतदेहाचा शोध घेतला. शिवदुर्ग रेस्क्यू पथकाने मदतकार्य करून मृतदेह दरीतून बाहेर काढला. पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, उपअधीक्षक गजानन टोणपे, पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनात शोध घेण्यात आला.
आत्महत्या की घातपात?
महाविद्यालयीन विद्यार्थिनी असलेल्या श्रेयाला फिरण्याची आवड होती. मात्र, तिच्या सततच्या फिरण्याला घरच्यांचा विरोध होता. त्याचा श्रेयाला राग होता. त्यातूनच तिने आत्महत्या केली असावी का? किंवा इतर काही कारणांमुळे तिचा मृत्यू झाला? किंवा काही घातपात आहे का? ती लोणावळ्यात फिरण्यासाठी एकटीच आली होती की आणखी कोणी तिच्यासोबत होते?, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. श्रेयाच्या पिशवीत ‘सुसाईड नोट’ मिळून आलेली नाही. तिच्या मोबाइल आणि लॅपटाॅपला पासवर्ड असून मोबाइल, लॅपटाॅपमधूनही काही माहिती मिळू शकते, असे पोलिसांनी सांगितले आहे.






