Home » राजकारण » मुंबईत महापौर पदासाठी मनसे भाजपाला पाठिंबा देणार? राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मी स्वतः.”

मुंबईत महापौर पदासाठी मनसे भाजपाला पाठिंबा देणार? राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मी स्वतः.”

Facebook
Twitter
WhatsApp
39 Views

मुंबईत महापौर पदासाठी मनसे भाजपाला पाठिंबा देणार? राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मी स्वतः.”

मुंबई महापालिकेतील महापौर पदावरून भाजपा आणि शिंदेसेनेत अंतर्गत वाद सुरू आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेवर स्वतःचा महापौर बसवण्याकरता सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपाबरोबर जाण्यास तयार असल्याचीही चर्चा यानिमित्ताने होत होती. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबईतील एमआयजी क्लब येथे मनसेच आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत खुद्द राज ठाकरेही उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर माध्यमांनी राज ठाकरेंना मुंबई महापौर पदासाठी भाजपाला पाठिंबा देण्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, “हे मी स्वतः सांगतोय, भाजपाला पाठिंबा देणार नाही” असं म्हणत राज ठाकरेंनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

संदीप देशपांडे यांनीही स्पष्ट केली होती भूमिका

मुंबई महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत मनसे भाजपाला समर्थन देणार आहे, अशा चर्चांबाबत बोलताना संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले की, “अशा प्रकारची कुठलीही चर्चा आमची भारतीय जनता पक्षाबरोबर झालेली नाही. अशा प्रकारचे कुठलेही समर्थन देण्याचा विषय नाही.” त्यामुळे मनसे मुंबईत भाजपाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

 

महापौर पदावरून शिंदे-भाजपात मतभेद

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवेसना (एकनाथ शिंदे) आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आले होते. भाजपाला ८९ आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाला २९ जागा मिळाल्या असून महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे. तरीही महापौर पदावरून दोन्ही पक्षांतील चर्चा अद्याप संपलेल्या नाहीत. त्यातच, महापौर पदासाठी भाजपाने हट्ट धरल्याने सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष इतर नगरसेवकांचा पाठिंबा मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

भाजपानेही मनसेशी संपर्क साधला असल्याची चर्चा आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मनसेने शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने आता मुंबईतही मनसे भाजपाला पाठिंबा देईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, ही शक्यता खुद्द राज ठाकरेंनीच फेटाळून लावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!