‘अजित पवारांच्या विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न, त्या व्यक्तीला..’; 5 प्रवासी होते की 6? गूढ कायम असतानाच…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत झालेल्या मृत्यूनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, या प्रकरणात नवनवीन माहिती रोज समोर येत आहे.
या विमानामध्ये पाचजण होते की सहाजण? असा सवालही उपस्थित केला जात आहे. सहाजण होते तर पाचच मृतदेह कसे सापडले? असा सवालही विचारला जातोय. असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी नवीन दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. खरं तर मिटकरींनी याआधीच काही शंका उपस्थित केल्या होत्या. आता अकोल्यात त्यांनी अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात आणखी एक दावा केला आहे. आधीच विमानात 5 प्रवासी होते की 6 हे गूढ कायम असतानाच नव्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.
मी अपघात झाला त्या सायंकाळी तिथं…
अमोल मिटकरी यांनी विमान ज्या ठिकाणी क्रॅश झालं तिथं आपण त्याच दिवशी सायंकाळी गेलो होतो अशी माहिती दिली. “घटनेच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता मी तिथं घटनास्थळी गेलो असता, तेथील सरपंचांनी धक्कादायक माहिती दिली,” असं मिटकरी म्हणाले. “विमानातून कोणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी पाहिलं होतं. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही जात असतानाच अचानक स्फोट झाला आणि पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, असं सरपंचांनी सांगितलं,” असा दावा मिटकरी यांनी केला आहे. या विधानामुळे संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.
जिवंत असेपर्यंत लढा देणार
अजित पवार यांच्या मृत्यूचं गूढ महाराष्ट्रासमोर राहू नये, त्याचा संपूर्ण उलगडा व्हावा यासाठी आपण जिवंत असेपर्यंत लढा देणार असल्याचा ठाम संकल्प अमोल मिटकरी यांनी यावेळी व्यक्त केला आहे. अजित पवार यांचा घातपात झाला असेल, तर त्याचा बदला घेणं ही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी असल्याचंही ते म्हणाले.
अजित पवारांवर टीका करणाऱ्यांवरही जोरदार निशाणा
यावेळी अमोल मिटकरींनी अजित पवारांवर टीका करणाऱ्यांवरही जोरदार निशाणा साधला. अजित पवारांबद्दल कोणी अपशब्द वापरले असतील, तर त्याला ताकदीने उत्तर देण्यात आम्ही समाधानी असून परिणामांची चिंता केली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
सीसीटीव्ही त्या दावशीचं नाही?
मिटकरी यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती उघड करताना सांगितलं की, सध्या दाखवला जात असलेला सीसीटीव्ही फुटेज हा घटनेच्या दिवशीचा नसून तब्बल तीन महिन्यांपूर्वीचा आहे. त्या दिवशी नेमकं काय घडलं, कोण उपस्थित होतं, अजित पवार कोणते कपडे घालून गेले होते? हे सगळं सत्य काळाच्या पडद्याआड जाऊ नये, यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. पक्षाच्या हितासाठी निर्णय घेणं महत्त्वाचं असून, येत्या काही दिवसांत सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान होतील, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, मिटकरी यांनी आणखी एक नवीन इच्छा व्यक्त केली आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेला ‘अजित दादा लाडकी बहीण योजना’ असं नाव द्यावं अथवा एखाद्या कृषी योजनेला अजित पवारांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे
एकूणच अजित पवार यांच्या मृत्यूबाबतचा संशय अधिक गडद होत असून, अमोल मिटकरी यांच्या या विधानांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.






