पुन्हा आमदार म्हणून निवडून येणं उद्धव ठाकरेंसाठी सोप्प नाही? विधानपरिषद निवडणुकीत अग्नि परीक्षा!
विधानपरिषदेच्या 9 आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. या नऊ आमदारांमध्ये उद्धव ठाकरेंचंही नाव आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधानपरिषदेवर जाणार का?
असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय, कारण विधानसभेत महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला मोठं यश मिळाले आहे. मविआकडे संख्याबळही कमी आहे. त्यामुळे विधानपरिषदेत भाजपला अॅडव्हान्टेज असेल तर उद्धव ठाकरेंना पुन्हा विधानपरिषदेवर जाण्यासाठी काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज असेल.
विधान परिषदेच्या 9 आमदारांचा कार्यकाळ मे २०२६ रोजी संपणार आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीचे एसपीचे आमदार शशिकांत शिंदे, दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी, काँग्रेसचे आमदार राजेश राठोड आणि भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा कार्यकाळ मे मध्ये संपणार आहे.
विधान परिषदेचे इतर तीन आमदार विधानसभेत निवडणून गेले आहेत. त्यात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, आणि रमेश कराड यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्याही जागा रिक्त झाल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा विधान परिषदेत जावं अशी इच्छा संजय राऊत यांनी देखील व्यक्त केलीय, 2020 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड करण्यात आली होती, दरम्यान त्यांच्या कार्यकाळ संपणार असल्यानं जनतेसाठी त्यांनी पुन्हा विधीमंडळात जावं अशी इच्छा राऊतांनी बोलून दाखवली.
विधान परिषदेवर पुन्हा निवडून येणं उद्धव ठाकरेंसाठी सोप्प नसणार आहे. कारण मविआकडे संख्याबळाची कमी आहे.. त्यात उद्धव ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एसपीचा पाठिंब्याची गरज भासणारय, संजय राऊतांनीही ते मान्य केलंय. मविआला एकमेकांना मदत करायला लागेल तरच आमची लोक विधानपरिषद आणि राज्यसभेवर निवडून येतील असं विधान राऊत यांनी केले. तर संजय शिरसाट यांनी मविआच्या संख्याबळावरून ठाकरेंना डिवचल आहे. उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ मे मध्ये संपणार आहे.. त्यांनी पुन्हा विधिमंडळात जावं ही ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची इच्छा आहे, मात्र उद्धव ठाकरे पुन्हा विधिमंडळात जाणार का? ते काय निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, तसंच पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसवरही ठाकरेंना अवलंबून रहावं लागणार आहे.






