तुळापूर (ता. हवेली): श्रीक्षेत्र तुळापूरजवळील नागरमल वस्तीतील १२व्या शतकातील प्राचीन श्री खंडोबा मंदिराच्या दिवाबत्तीसाठी पुजाऱ्यांना उदरनिर्वाहासाठी दिली गेलेली जमीन विक्रीच्या तयारीत असल्याचा गंभीर आरोप मंदिरातील पुजाऱ्यांनी केला आहे. या निषेधार्थ त्यांनी देवस्थानच्या पायथ्याशी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
या विक्रीला विरोध करत लोणीकंद पोलीस ठाणे, धर्मादाय आयुक्त कार्यालय पुणे, प्रधान सचिव (विधी व न्याय विभाग, मुंबई), गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, आणि पत्रकार भवन, पुणे येथे निवेदन देण्यात आले आहे.
श्री क्षेत्र तुळापूर हे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या शेजारी वसलेले असून, येथे असलेले नागरमल खंडोबा मंदिर हे अत्यंत पुरातन असून त्याच्या नावे मांजरी बुद्रुक येथे २४ एकर व तुळापूर येथे २५ एकर अशी एकूण ४९ एकर जमीन आहे. आंदोलक पुजाऱ्यांनी सांगितले की, सद्य ट्रस्ट प्रशासनाने धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता मांजरी येथील जमीन खाजगी लोकांना विकण्याचा प्रयत्न केला असून, काही रक्कम “विसार” म्हणून स्वीकारल्याचे निदर्शनास आले आहे.
“संपत्तीच्या लोभात ट्रस्टने मनमानी कारभार सुरू केला आहे. ही जमीन आमच्या पूर्वजांनी देवासाठी दान दिली होती, ती विकली जाऊ नये,” असा ठाम पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
“गेल्या तीस वर्षांपासून मी या जमिनीच्या रक्षणासाठी लढा देत आहे. उलटपक्षी माझ्या प्रयत्नांमुळेच आजवर ही जमीन वाचली आहे,” अशी प्रतिक्रिया मधुकर घुले, अध्यक्ष – श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट यांनी दिली. त्यांनी स्पष्ट केले की, मांजरी येथील जमीन आजही कुळांकडे आहे आणि तुळापूरची जमीन स्थानिक पुजाऱ्यांच्या ताब्यात आहे.
आंदोलकांनी सध्याचा ट्रस्ट त्वरित बरखास्त करून नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती करण्याची व जमिनीची विक्री तात्काळ थांबवावी, अशी जोरदार मागणी केली आहे.