वाघोली, भावडी, लोणीकंद परिसरातील खाण-क्रेशर उद्योगांवर बंदीची मागणी – जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र
पुणे – वाघोली, भावडी आणि लोणीकंद परिसरातील खाण व क्रेशर उद्योगांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून या सर्व उद्योगांवर तातडीने बंदी घालावी, अशी ठाम मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.
धुळीमुळे त्रास, श्वसनाचे विकार वाढले
या परिसरात सतत उडणाऱ्या धुळीमुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक नागरिकांना श्वसनाचे गंभीर आजार होत आहेत. घरातही धुळ साचते, नाक, घसा, डोळ्यांची चिरड, दम्याचे त्रास वाढत आहेत. हे आरोग्याशी सरळ संबंधित असून नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.
ब्लास्टिंगमुळे घरांना तडे, ध्वनीप्रदूषणाचा स्फोटक परिणाम
क्रेशरमध्ये होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे आवाज इतका प्रचंड होतो की अनेक घरांना तडे गेले आहेत. ध्वनीप्रदूषणाचा थेट परिणाम नागरिकांच्या मानसिक आरोग्यावरही होत आहे. रात्रंदिवस सुरू असलेल्या आवाजामुळे लहान मुलांचे शिक्षण, वृद्धांचा विश्रांती वेळ आणि सर्वसामान्य नागरिकांचा शांतता हक्क धुळीला मिळाला आहे.
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांचा पुढाकार
बकोरी (ता. हवेली) येथील रहिवासी चंद्रकांत वारघडे यांनी तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर या विषयाची गंभीर दखल घेत डॉ. देसाई यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे उप-प्रादेशिक अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये त्यांनी सर्व क्रेशर उद्योगांवर योग्य ती कारवाई करून तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा
या पत्राची प्रत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तक्रारदार वारघडे यांना पाठवण्यात आली आहे. आता संपूर्ण परिसरातील नागरिकांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील कृतीवर केंद्रित झाले आहे.
आरोग्यावरचा घात – आता सहनशक्ती संपली!नागरिकांचे हक्क वाचवण्यासाठी ठोस कारवाईची गरज.. वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे