पुणे, खराडी: मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर खराडी पोलिसांनी मोठी कारवाई करत सिल्व्हर सोल स्पा ब्युटी अॅण्ड वेलनेस (गोल्ड प्लाझा बिल्डिंग, खराडी-मुंढवा रोड) येथे छापा टाकून तब्बल ६ पीडित महिलांची सुटका केली आणि एकाला अटक केली.
खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर बनावट ग्राहक पाठवून ही कारवाई करण्यात आली. कारवाईत मणिपूरची रहिवासी लेनखोकै किपगेन हिला अटक करण्यात आली असून, स्पाचा मालक विकास किशोर ढाले (रा. अमरावती) याचा पोलीस शोध घेत आहेत.
सदर महिलांमध्ये तीन थायलंड, एक नागालँड, एक मणिपूर व एक पुण्याची महिला यांचा समावेश आहे. न्यायालयाने त्यांना महिला सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त हिंमत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण व त्यांच्या पथकाने केली.
गुन्हा गु.र. नं. ६९/२०२५, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम व भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण करीत आहेत.