हवेली तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने हवेली तालुक्यातील खासगी रुग्णालयांनी इमर्जन्सी पेशंटकडून डिपॉझिट स्वीकारू नये आणि शासकीय आरोग्य योजना तातडीने लागू कराव्यात, अशी केली मागणी….
वाघोली/हवेली : हवेली तालुक्यातील सर्व खासगी हॉस्पिटल व्यवस्थापनांना भारतीय जनता पार्टी हवेली तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे इमर्जन्सी परिस्थितीत रुग्णांकडून कोणतेही डिपॉझिट घेतले जाऊ नये, यासाठी त्वरित पावले उचलावीत आणि यासंदर्भात अधिकृत पत्रक जारी करावे, अशी मागणी करण्यात आली.या वेळी भारतीय जनता पार्टी हवेली तालुकाध्यक्ष विजय जाचक, प्रदीप दादा सातव, संजय कड आणि चिन्मय सरकार आदि उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हॉस्पिटल प्रशासनास समजावून सांगितले की, अत्यावश्यक सेवेच्या क्षणी रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना डिपॉझिटच्या नावाखाली अडथळा निर्माण करणे अमानवी आहे. तसेच, अनेक हॉस्पिटलमध्ये शासकीय आरोग्य योजना अद्याप लागू करण्यात आलेल्या नाहीत, त्या तातडीने लागू कराव्यात.
यावेळी त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर ही मागणी मान्य करण्यात आली नाही आणि आवश्यक ती पावले उचलण्यात आली नाहीत, तर भारतीय जनता पार्टी हवेली तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , तसेच कायदेशीर कारवाईसाठीही पुढाकार घेतला जाईल.
भाजपच्या या स्पष्ट आणि आक्रमक भूमिकेमुळे तालुक्यातील आरोग्य व्यवस्थापनात खळबळ निर्माण झाली असून, नागरिकांच्या हितासाठी उचललेला हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.