पुणे – भारत-पाक युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काल (१७ मे २०२५) रोजी पुण्यातील गुडलक चौकातील कलाकार कट्टा येथे कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेचे प्रास्ताविक मार्क्सवादी लेनिनवादी (लाल बावटा) पक्षाचे युवा नेते काॅ. दीपक पाटील यांनी केले.
या वेळी बोलताना कॉ. पाटील यांनी देशातील गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री तसेच माध्यमांवर (मिडिया) बेजबाबदारपणाचा आरोप करत तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. तसेच, अलीकडेच जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करत, या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सामान्य नागरिकांना व लष्करातील जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सभेला समाजवादी पार्टी पुणे जिल्हा महिला अध्यक्षा साधनाताई शिंदे, जबाब दो आंदोलनाचे नेते दत्तात्रय जाधव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिन देसाई, विलासभाऊ सुरसे, अँड. रणसिंग, राष्ट्र सेवा दलाचे अँड. सयाजी शिंदे, मुक्ता कदम, राष्ट्र सेवा दल राज्य कार्यकारिणी सदस्य व समाजवादी पार्टी पुणे शहर व जिल्हा सरचिटणीस दत्ता पाकिरे, नुसार खान, फरीद तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
या सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणांतून सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर टीका केली आणि देशातील सुरक्षेच्या प्रश्नांवर गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाची सांगता उपस्थितांनी शहीद जवानांना आदरांजली अर्पण करून केली.