462 Views
ती माकडीण गेली, पिल्लूही गेले… पण तिसरं माकड अजूनही थांबलेलं आहे. कुणासाठी? प्रेमासाठी? आठवणींसाठी? की आपल्याला एक धडा देण्यासाठी…?
कोरेगाव भीमा परिसरात गेल्या काही दिवसांपासून एक माकडीण, तिचं पिल्लू आणि त्यांच्यासोबत असणारं आणखी एक माकड फिरताना दिसत होते. माणसाच्या वस्तीशी जवळीक साधत, आपलं छोटंसं कुटुंब जपणारे हे जीव अनेकांच्या नजरेत आले होते.
परंतु, काल एका दुर्दैवी घटनेत पिल्लाचा मृत्यू झाला आणि त्याला वाचवण्याच्या धडपडीत त्या माकडीणीला पण करंट लागला, आणि तिने देखील प्राण सोडले. ही घटना पाहून डोळे पाणावणारी ठरली. आणि अजूनही त्या दोघांच्या मृतदेहाजवळ तिसरं माकड शांतपणे बसलेलं आहे… न हलणं, न बोलणं—फक्त नि:शब्द वेदना.
या घटनेची माहिती मिळताच निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्था या संस्थेचे पदाधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या मयत माकडांना ताब्यात घेत वनविभागाच्या हवाली केलं.संस्थेचे पदाधिकारी म्हणाले, “प्रत्येक जीवाला जिवंतपणाची आणि सुरक्षिततेची गरज असते. ही घटना केवळ वन्यजीवांचं दु:ख नाही, तर आपल्या व्यवस्थेच्या असंवेदनशीलतेचं दारुण उदाहरण आहे.”
ही घटना आपल्याला माणुसकीचा आणि संवेदनशीलतेचा आरसा दाखवून गेली आहे. माकडांची ही नि:शब्द साथ माणसालाही खूप काही शिकवून जाते—प्रेम, निष्ठा आणि हरवलेली भावना.