लोहगाव रोडवरील रोहन अभिलाषा परिसरातील स्विचिंग सबस्टेशनमध्ये दुपारी १२ वाजता अचानक बसमधून धूर येऊ लागल्याने सबस्टेशन बंद करण्यात आले. तांत्रिक तपासणीत बस कप्लरजवळ शॉर्टसर्किट झाल्याचे निदर्शनास आले. तातडीने उपाययोजना करत महावितरणच्या वाघोली शाखेच्या कर्मचाऱ्यांनी बस बार डिसमेंटल करून फॉल्टी भाग अलगद केला आणि केवळ तीन तासांत म्हणजेच दुपारी ३.१५ वाजता सबस्टेशन पुन्हा सुरू केले.
या कामाची खास बाब म्हणजे, सामान्यतः अशा बिघाडांसाठी बाह्य एजन्सीची मदत घेतली जाते. मात्र वेळ वाचवण्यासाठी आणि नागरिकांचा वीजपुरवठा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी वाघोली शाखेतील कर्मचाऱ्यांनी स्वतः बस चेंबरमध्ये उतरून फॉल्ट शोधला आणि एकजुटीने काम करून वीजपुरवठा पूर्ववत केला.
शाखा अभियंता बाबर यांनी सांगितले की, “हे काम अत्यंत जिकिरीचे होते, पण आमच्या कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि लोकांची गैरसोय टाळली. पुढील गुरुवारी शटडाऊन घेऊन उर्वरित फॉल्टी भागाची दुरुस्ती केली जाईल.”
महावितरणच्या कर्मचाऱ्यांची तत्परता आणि कार्यक्षमता कौतुकास्पद असून, त्यांच्या या प्रयत्नामुळे रोहन अभिलाषा व वाघोली परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.