खेळाडूंच्या यशामागील योगदान जपणाऱ्या मातांचा जिजामाता सन्मान पुरस्काराने प्रदान
पुणे : प्रतिनिधी देशातील क्रीडा क्षेत्रात यश मिळवलेल्या खेळाडूंच्या यशामागे त्यांच्या मातांचे मोलाचे योगदान असून याच योगदानाची दखल घेत ‘क्रीडा भारती’ संस्थेच्या वतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या मातांचा गौरव करत त्यांना ‘जिजामाता सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा पुण्यात राज्याचे क्रीडा व युवक मंत्री दत्तात्रय भरणे आणि तेनसिंग नोर्गे सन्मानित गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी क्रीडा भारतीचे अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय पुरंदरे, क्रीडा भारतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते शरदराव गोडसे, आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मंत्री दत्तात्रय भरणे यांनी फिटनेस फॉर ऑल, खेलो इंडिया यांसारख्या योजनांमुळे देशात निर्माण झालेल्या सकारात्मक व पोषक वातावरणामुळे क्रीडा क्षेत्रात भारताने उल्लेखनीय यश मिळवले आहे, असे सांगितले. महाराष्ट्रानेही गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय आणि खेलो इंडिया स्पर्धांमध्ये सातत्याने अव्वल कामगिरी केली असून राज्य शासन खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी सांगितले की, प्रत्येक यशस्वी खेळाडूच्या मागे आई-वडिलांचा मोठा त्याग आणि कष्ट असतो, मात्र ते प्रसिद्धीपासून दूर असतात.
क्रीडा भारतीने अशा मातांचा सन्मान करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी गिर्यारोहण क्षेत्रातही करिअरसाठी मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे नमूद केले. यंदा ‘जिजामाता सन्मान पुरस्कार’ मिळवणाऱ्या मातांमध्ये मॅटवरील कुस्तीपटू अमोल बराटे यांची आई चंदा लक्ष्मणराव बराटे, कबड्डीपटू आम्रपाली गलांडे यांची आई सुरेखा, वुशूपटू कल्याणी जोशी हिची आई अनुराधा, बुद्धिबळपटू आदित्य सामंत यांची आई संध्या, स्केटिंगपटू श्रुतिका सरोदे हिची आई रंजना, मॉडर्न पेन्टथलॉन खेळाडू विराज परदेशी यांची आई बेला, अॅथलेटिक्सपटू यमुना लडकत हिची आई सुनंदा, एव्हरेस्टवीर भूषण हर्षे यांची आई भाग्यश्री, योगासनपटू नितीन पवळे यांची आई जयश्री, प्रस्तारोहणपटू सानिया शेख हिची आई निगर, तायक्वांदोपटू कोमल घारे यांची आई सुरेखा, अश्वरोहनपटू आशिष लिमये यांची आई डॉ. विमला यांचा समावेश होता.